सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण तापलं असून आता नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या विधानपरिषदेच्या रिंगणात निर्माण झालेला महायुतीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. मी कोणतंही आश्वासन मागितलं नाही तसेच घेतलेलेही नाही. राज्यात १७ जागांवर युती आहे. त्यामुळे थांबावं लागेल, असे मला सांगितलं, त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया गणेश गीते यांनी दिली.
गेल्या २४ तासांपासून मुंबईत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेनंतर गणेश गीते यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आता याबद्दल गणेश गीते यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भावाच्या बंडखोरीसोबत निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली.
मी दोन दिवस मुंबईत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्याशी आमची चर्चा झाली. या चर्चेनंतर मी असा निर्णय घेतला आहे की घरी जाऊन वरुन आदेश येताच मी निवडणुकीतून माघार घेणार आहे. मी काल एकनाथ शिंदेंकडेही गेलो होतो. त्यांनीही मला शब्द दिलाय की आम्ही तुझं पुनर्वसन करु. गिरीश महाजनांनीही हेच सांगितलं. त्यामुळे चर्चा करण्याचा काही विषयच येत नाही. उदय सामंत यांच्याशी माझी काहीही चर्चा झाली नाही, असे गणेश गीते म्हणाले.
माझे बंधू गोकुळ गिते माझ्याही संपर्कात नाहीत. मी आता घरी गेल्यानंतर तो कुठे गेलाय याची तिथूनच माहिती मिळेल. त्यानंतर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. गोकुळ जर मला ३ वाजण्याच्या आधी भेटला तर निश्चितपणे मी त्याचे आणि गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांचेही बोलणं करुन देईन, असेही गणेश गीते यांनी म्हटले.