सध्या राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यसभेच्या रिक्त जागेवरून हालचालींना वेग आला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर नेमकी कोणाला संधी द्यायची, यावर महायुतीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आता याबाबतचा शेवटचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. राज्यसभेच्या उमेदवाराचा निर्णय आता फडणवीसांच्या कोर्टात घेतला जाणार आहे. त्यामुळे आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात घेतला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती दिली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशी विनंतीही राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करू त्यानंतर आज रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना याबाबत कळवू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.