अधिक मासाचा महिना सुरू असून आता जावयाचा मानपान लेकीचं कौतुक या गोष्टी आल्याचं. अशाच एका कुटुंबाने आपल्या जावयाचा मानपाना साठी सोन्याची अंगठी आणली खरी पण ती अंगठीच मांजराने गिळून घेतल्याने कुटुंबाची चांगलीच धांदळ निर्माण झाली होती.
बीडमध्ये आपल्या जावयासाठी केलेला धोंडा मांजरीने खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. धोंड्याच्या महिन्यासाठी आलेल्या जावयाला सरप्राईज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो इतर धोंड्यांसोबत ठेवला. मात्र, स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात आलेल्या मांजरीने नेमका तोच धोंडा खाऊन टाकला, त्यामुळे घरच्यांची धांदल उडाली.
माजलगाव येथील एका वस्तीवर 4 जून रोजी ही घटना घडली. गिळलेली अंगठी परत मिळावी म्हणून मांजरीला चक्क चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आलं. विष्ठेतून ही अंगठी बाहेर पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने तिला पशुवैद्यकाकडे नेऊन उलटीसाठी औषधे देण्यात आले. परंतु मांजरीला उलटी झाली नाही उलट त्यात मांजरीचा जीव गेला. त्यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. या विचित्र घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या विचित्र घटनेची जिल्हाभरात चर्चा होत आहे. मांजरीने अंगठी गिळल्यामुळे जावयाला वाणाच्या दिवशी आहेरासाठी आणलेल्या कपड्यांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, मांजर मेल्यावर तिच्या पोटातील अंगठी बाहेर काढण्यात आली आहे. ही अंगठी जावयाला देण्यात आली की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाही.