मुंबई : लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. अगदी काही दिवसांवर ही निवडणूक आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. नुकतेच भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता प्रत्येक पक्ष सभांचा धडाका लावत आहे.
दरम्यान आज राज्यात उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभा पार पडणार आहे. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणूक जाहीर होईल त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे . शरद पवारांच्या सभेनंतर मंचर येथे अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे.
सकाळी १० वाजता शिरुरच्या मांडवगण फराटामध्ये तर दुपारी ३ वाजता मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी अजित पवार जनतेला संबोधित करणार आहेत.
तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आजपासून या सभेला सुरुवात होईल. साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकंणगले आणि सांगली इथं या सभा होतील.
तर खोपोली, पनवेल आणि उरण या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. तळोजामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पनवेलमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर खोपोलीच्या झाकोटिया मैदानात ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.