उद्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून अनेक दावे केले जास्त आहेत. दरम्यान ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी चक्क अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर ते आपला दावाकरुनच थांबले नाहीत, तर थेट भलेमोठे बॅनरही त्यांनी झळकावले आहे. ज्यावर मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार असा उल्लेख आढळतो आहे. या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
तसेच, या पोस्टरमुळे महायुतीमध्येही काहीसा तणाव निर्माणहोण्याची शक्यता आहे. कारण, एका बाजूला अजित पवार दुसऱ्या बाजूला भाजपमधून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तर महायुतीचा एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेले एकनाथ शिंदे हे स्वत: विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे एका पदावर तिघांचा दावा आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या म्हणजेच (शनिवार, 23 नोव्हेंबर) पार पडत आहे. महायुती आणि महाविकासआघाडी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही आपणच सत्ता मिळवणार अशी खात्री आहे. दरम्यान, संभाव्य सत्तास्थापनेमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी दोन्ही बाजूतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. त्यावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर हटविण्यात आले आहेत.