आजकाल गुंडागर्दी आणि दादागीरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अतिशय शुल्लक अशा कारणांवरूनही काही लोकं गुंडागर्दी करत हाणामारी करत असल्याचे पाहायला मिळतेय. दरम्यान अशीच एक घटना गोंदिया येथे घडली आहे. शुल्लक कारणावरून एसटी बस चालकाला प्रवाशांसमोरच दुचाकीस्वाराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत अकोटोला ब्राह्मणी मार्गावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुल्लक कारणावरून एसटी बस चालकाला प्रवाशांसमोरच दुचाकीस्वाराने बेदम मारहाण केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगाराची बस क्रमांक एमएच 40 - 8852 चे चालक मोहम्मद साहिद मोहम्मद शफी शेख, रा. घोटी हे प्रवासी भरून गोंदिया येथून तिल्ली मोहगावकडे निघाले. मोहगाव येथे प्रवाशांना सोडून 40 प्रवाशांना घेऊन गोंदियाच्या दिशेने येत असताना मागून एम 35 एझेड 0115 क्रमांकाच्या दुचाकीवरून येत होता. चंपकलाल अग्रवाल आणि पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने जागा न देण्याच्या कारणावरून बस समोर मोटारसायकल उभी करून बस थांबवली. चालकाला शिवीगाळ करत त्याने बस चालकाला बसमधून खाली खेचले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
एसटी चालक घोटी रहिवासी मोहम्मद शाहिद मोहम्मद. सफी शेख यांच्या फिर्यादीवरून, आरोपी विजेश चंपकलाल अग्रवाल, वय 30, रा. तिल्ली मोहगाव आणि एका व्यक्ती विरुद्ध बीएनएस 2023 चे कलम 132, 121, (1) 3 (5) अन्वये गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.