नाशिक - शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत गिते यांना ईव्हीएम मशीन हॅक करून निवडून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिकमध्ये सातत्याने विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या प्रकारे फसवण्याचे प्रकार समोर येत आहेत. याच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना तिकीट मिळवून देतो असे सांगून पंतप्रधान कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत उत्तर प्रदेशात दोन युवकांनी पैसे मागितल्याची घटना घडली होती.
दिवाळीच्या आधी क्राईम ब्रँच युनिट 1ने दिल्लीतून या दोन तरुणांना अटक केली होती. त्यानंतर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणारे मविआचे उमेदवार माजी आमदार वसंत गिते यांच्या कार्यालयात जाऊन ईव्हीएम मशीन हॅक करून देतो असे सांगून सुमारे 42 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये आता तातडीने द्यावे लागतील असे सांगितले होते.
या घटनेनंतर तातडीने पैसे देण्यास नकार देऊन वसंत गिते यांच्या कार्यालयातील आनंद शिरसाट यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये काल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट 1कडे सोपविला होता. त्यानंतर या बाबत माहिती घेत मूळचा अजमेर येथील असणारा आणि सध्या नाशिक मधील मखमलाबाद येथील इरिगेशन कॉलनीमध्ये राहणारा भगवान सिंग नारायण चव्हाण या 34 वर्षीय युवकाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले असून तो नाशिक शहरामध्ये गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून मार्बलचे काम करत आहे. निवडणुकीची संधी साधून पैसे कमविण्यासाठी त्याने ही शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस कर्मचारी प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, संदीप भांड, प्रदीप म्हस्के, रोहिदास लिलके, रमेश कोळी, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, विठ्ठल काठे, किरण शिरसाट आदींनी प्रयत्न करून या गुन्ह्याची उकल केली आहे.