राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्क (RNP) मधील व्याघ्र प्रकल्पातील सुमारे 75 लोकसंख्येपैकी 25 वाघ गेल्या वर्षभरात बेपत्ता झाले आहेत, असे राजस्थानचे मुख्य वन्यजीव वॉर्डन पवन कुमार उपाध्याय यांनी सोमवारी RNP अधिकाऱ्यांना सांगितले.दरम्यान, बेपत्ता वाघांचा शोध घेण्यासाठी तीन सदस्यीय तपास पथक तयार करण्यात आले आहे. तपास पथक या प्रकरणाचा अहवाल दोन महिन्यांत मुख्य वन्यजीव वॉर्डन कार्यालयाला सादर करणार आहे.
विशेष म्हणजे, एका वर्षात एवढ्या मोठ्या संख्येने वाघ बेपत्ता झाल्याचा अधिकृत अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून 13 वाघ बेपत्ता झाले होते.
दरम्यान , रणथंबोरमधून वर्षभरात 25 वाघ बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. वाघ बेपत्ता झाल्याची बातमी विभागीय व्याघ्र निरीक्षण अहवालातूनन समोर आली आहे. याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक पी.के. उपाध्याय यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून, ही चौकशी समिती रणथंबोरमधून बेपत्ता झालेल्या वाघांचा अहवाल दोन महिन्यांत सादर करणार आहे.
पवनकुमार उपाध्याय यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी मोहनराज जयपूर आणि मानस सिंग यांची चौकशी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही चौकशी समिती वाघ बेपत्ता झाल्यानंतर शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी करेल.
तसेच, ही समिती देखरेखीच्या नोंदींचे पुनरावलोकन करेल आणि उद्यान अधिकाऱ्यांकडून त्रुटी आढळल्यास कारवाईची शिफारस करेल. १७ मे २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत न दिसलेल्या १४ वाघांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासंदर्भात चार नोव्हेंबरला अधिकृत आदेश काढण्यात आला.
या आदेशात असे म्हटले आहे की, रणथंबोरच्या निरीक्षण मुल्यांकनातून वाघ बेपत्ता झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. यासंदर्भात रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्र संचालकांना वारंवार नोटीस पाठवण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही कोणत्याही लक्षणीय सुधारणांची नोंद करण्यात आलेली नाही. १४ ऑक्टोबर २०२४ च्या अहवालानुसार, एक वर्षांहून अधिक काळापासून ११ वाघांचा काहीच ठावठिकाणा नाही. तर इतर चौदा वाघांची स्थितीदेखील सारखीच आहे. त्यामुळे रणथंबोरमधील बेपत्ता वाघांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, असेदेखील या आदेशात म्हटले आहे.
रणथंबोरमधून वाघ बेपत्ता होत असल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, वाघांची संख्या वाढत आहे, वाघांना प्रदेशासाठी पुरेशी जागा मिळत नाही, त्यामुळे वाघांमध्ये परस्पर संघर्ष वाढत असून, कमजोर वाघ रणथंबोरमधून बाहेर पडत आहेत. तसेच, अनेक वेळा शक्तिशाली वाघाशी संघर्ष होऊन दुर्बल वाघाचा मृत्यूही होतो. विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा मृत वाघांचा शोध लागत नाही आणि विभाग वाघ बेपत्ता झाल्याचे मानतो. रणथंबोरमधील अधिकारी व्याघ्र संवर्धनापेक्षा पर्यटनावर भर देतात, असे वन्यजीव तज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमी सांगतात.