अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.दरम्यान आता या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांच कडून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 16 व्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.आरोपी गौरव 23 वर्षांचा आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये गौरव अन्य आरोपींना अनेकवेळा भेटल्याची आणि त्यांच्यासोबत हत्येचा कट रचल्यात सहभागी झाल्याची माहिती आहे.
गौरव हा हत्येमध्ये पहिल्या फळीतील मारेकर्यांच्या संपर्कामध्ये होता. पहिल्यांदा ज्यांना बाबा सिद्दीकींची हत्या करण्याची सुपारी दिली होती त्यांनी बॅक आऊट केले. आता पोलिस गौरवला कोर्टात दाखल करून त्याची कोठडी मागणार आहेत.दरम्यान, यामध्ये वापरलेली हत्यारं राजस्थान मधून आणल्याचा दावा आहे. यामधील 5 हत्यारं ताब्यात घेण्यात आली असून सहाव्या हत्याराचा शोध सुरू आहे.