गाडी मध्ये CNG भरत असताना मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेकायदेशीररित्या वाहनात गॅस भरती केल्याने जळगावात ओमनी गाडीला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या घटनेत ओमिनी गाडी जळून खाक झाली असून गॅस भरणारे 3 जण आणि एक गाडी मालक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातून ही गंभीर घटना घडली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला. त्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत भाजलेल्या गंभीर चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण ओमनी दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. या स्फोटामध्ये एक बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉल सारखी उडाल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शनी दिली आहे. संबंधित परिसरात एमआयडीसी पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेनंतर नागरिकांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.