विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीआवर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन त्यांनी टीका केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला. दरम्यान, यावरून अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल करत पलटवार केला आहे. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना इशाराच दिला आहे.
''ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही'', अशा शब्दात अजित पवारांनी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. अजित पवार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान , शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे...मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा...महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.