विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान , जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात प्रचाराला सुरवात झाली असून या दरम्यान प्रचार सुरु झाल्यानंतर खळबळजनक घटना घडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगमध्ये अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. पण सुदैवाने बंदुकीतून निघालेल्या गोळ्या या सोनवणे यांना न लागता त्यांच्या गाडीवरुन गेल्या. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या 3 अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. पण सुदैवाने ते बचावले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. यानंतर विनोद सोनवणे यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणी 24 तासांच्या आत कारवाई करत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत काय-काय कारवाई केली, याबाबतची माहिती दिली. तीन आरोपींना अटक करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं.
गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हाकरता वापरलेली पिस्तूल आणि गाडी जप्त केली आहे. या प्रकरणातील आणखी 2 आरोपी हे फरार आहेत. त्या दोनही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. पण संबंधित घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींनी या कारणाने केला गोळीबार
अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी काही जण आले. आमच्याकडे भरपूर लोक आहेत. निवडणुकीत इलेक्शनचं कॅम्पिंग करून मदत करू, असं सांगत त्यांनी अपक्ष उमेदवार सोनवणे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पण सोनवणे यांनी पैसे न दिल्याने त्यांनी धाक दाखवण्याच्या उद्देशाने फायरिंग केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.