नाशिक , दि १९ : (भ्रमर प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूकीसाठी उद्या , बुधवार दि. २० रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळात जिल्हयातील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी झाली असून मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी त्या त्या मतदान केंद्रावर आज दुपारीच रवाना झाले आहेत . तसेच रात्री उशिरापर्यंत या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदान यंत्रांसह सर्व साहित्याची मांडणी केली असून उद्या सकाळी मतदानासाठी सर्व मतदान केंद्र सज्ज करण्यात येत आहेत .
जिल्हयातील पंधरा जागांसाठी १९६ उमेदवार रिंगणात आहेत . तर जिल्ह्यात एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २४ लाख ४६ हजार ९६८ महिला आहेत तर २६ लाख १४ हजार ९६ पुरूष मतदार आहेत. जिल्हयातील १५ विधानसभा मतदार संघात ४ हजार ९२२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तर निवडणूक कामासाठी जिल्हयात २७ हजार ७१ कर्मचारी निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आली आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून गेल्या महिनाभरापासून विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. महाविद्यालयासह ज्या भागात गेल्या निवडणूकीत कमी मतदान झाले आहे अशा भागात जिल्हा निवडणूक विभागाकडून जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मतदार सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून बीएलओ उपस्थित राहुन मतदारांना मतदार यादीतील नाव शोधून देण्यास मदत करणार आहेत. वोटर हेल्पलाइन अॅपच्या माध्यमातूनही मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादी अनुक्रमांक माहित करून घेता येणार आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, टॉयलेट, व्हीलचेअर, पाळणारघर, स्वयंसेवक इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.