पुणे : कंटेनर चालकाने अरेरावी केल्याचे अनेव प्रकार समोर आले आहे. यात आतापर्यंत अनेकदा अनेकांनी जीव गमावला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकांचे असे प्रकार संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर मोठा अनर्थ टळलाय. चालकाने थेट कंटेनर बीआरटी मार्गात तो ही विरुद्ध दिशेने घुसवला. रागाच्या भरात त्याने कंटेनर मागे घेण्यास नकार दिला. शेवट सगळ्यांनी हार मानली आणि त्या कंटेनरला जाण्यासाठी रिव्हर्स गाड्या घेऊन जागा दिली.
नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवड चौकातील हा प्रकार आहे. चालकाने थेट कंटेनर बीआरटी मार्गात तो ही विरुद्ध दिशेने घुसवला. त्याचवेळी समोरून चारचाकी आणि पीएमपीएमएलच्या बस येत होत्या. कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, तो कोणाचंचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. सुदैव इतकंच की, त्यानं कंटेनर जागे वर थांबवला. त्याने कंटेनर रिव्हर्स घ्यावा यासाठी त्याला विनवणी करण्यात आली. पण तो अडून राहिला, शेवटी कंटेनर समोर उभी असलेली कार आणि बस चालकांनी रिव्हर्स घेतली. त्यानंतर कंटेनर चालक सुसाट निघाला, त्यावेळी बेधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाने आधी नेहमी प्रवाश्यांची रेलचेल असणाऱ्या पीएमपीएमएल बस स्टॉपला ठोकर दिली, मग बीआरटी मार्गाचे बॅरिगेट ही तोडले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांकडून या चालकाचा शोध सुरू आहे. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने हे का केलं, हे स्पष्ट होणार आहे.