पुणे शहरातील लोहियानगर परिसरात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत भाजप पदाधिकाऱ्याच्या हाताचा अंगठाच तोडला.
याप्रकरणी खडक पोलिसांना आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय दत्ता ढावरे (रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तर सलमान उर्फ बल्ली नासीर शेख (वय ३१), युसुफ उर्फ अतुल फिरोज खान (वय २४), सुलतान चाँद शेख (वय २६), असिफ उर्फ मेंढा इक्बाल सय्यद (वय ३६, तिघेही रा. लोहीयानगर) आणि असलम पटेल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अक्षय ढावरे हे कसबा मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. याबाबत अक्षयचे भाऊ नागेश ढावरे याने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अक्षय आणि त्यांचे मित्र हे शंकरशेठ रस्ता परिसरातील एका हॉटेवर चहा पित बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकींवरून तिथे आले. ‘लोहियानगरमें मसीहा बन रहा है, आज इसको मारने का ’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना जातीवाचक शिवीगाळ केली. इतकंच नाही, तर आरोपींनी अक्षय यांच्यावर कोयत्याने सपासप वार देखील केली.
या घटनेत अक्षय यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. कोयत्याचा वार रोखत असताना अक्षय यांच्या हाताचा अंगठा तुटला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते. परिसरातील नागरिकांनी अक्षय यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी खडक पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.