राज्याची राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने बुधवारी (24 जुलै 2024) महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा दिला आहे.
रायगड, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट
कोकणातील रायगड जिल्ह्यात आणि पश्चिम घाटाला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
पुणे, ठाणे, कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाचा अंदाज
ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
नंदूरबार, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांतही गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर अधूनमधून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.