पावसाचा जोर ओसरला ! पाहा राज्यातील हवामानाची स्थिती
पावसाचा जोर ओसरला ! पाहा राज्यातील हवामानाची स्थिती
img
दैनिक भ्रमर

गेल्या आठवड्यात राज्यात अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती.  दरम्यान , कालपासून पावसाचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळते आहे. 
पाहूयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासात सामान्यतः ढगाळ आकाश राहून रिमझिम पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील उकाड्यात वाढ होणार असून कमाल तापमान देखील अधिक राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 33 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस एवढं तापमान राहू शकते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका पाऊस होऊ शकतो.

तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामधील वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. तर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो. तसेच , नाशिक जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरड हवामान असणार आहे.

तर मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यांमधील पावसाचा जोर कमी झाला असून तुरळक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group