महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी रणनिती काय असेल, पक्ष किती जागा लढणार, तिकीटाचे वाटप कसे होणार, याबद्दल जाहीरपणे माहिती दिली. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यातील भाषणादरम्यान त्यांनी याबद्दल भाष्य केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला होता. गुरुवारी २५ जुलै सकाळी ११ वाजता हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मनसेचे सूत्र कसं असेल याची माहिती दिली. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटांचे वाटप कशाप्रकारे केले जाईल, याबद्दलही सांगितले.
“आजच्या बैठकीला बोलावण्याचं कारण म्हणजे, हे सर्व्हे असतो ना, पक्षातील एक चार पाच जणांची टीम केली आहे. तुम्हाला माहीत नसेल. ते तुमच्या तालुक्यात येऊन गेले. सर्व्हे झाला. पत्रकारांशी बोलले, परत ते चार पाच दिवसात तुमच्याकडे येतील. तुम्हाला भेटतील. काय परिस्थिती आहे. ते सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकते. काय करता येऊ शकतं, याचा विचार करा. आकलन करा”, असे राज ठाकरे म्हणाले.
“निवडून येण्याची कॅपेसिटी असलेले, तयारी असलेल्यांनाच तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही. तुम्ही जे बोलाल, सांगाल, जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष येऊ शकले नाही. जे कुणी आहे, माहिती आहे. ती नीट माहिती द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक केली जाणार आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. काहीही करून. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत. तुमच्यापर्यंत ही लोकं येतील. मग युती होईल का जागा मिळतील का. असा निर्णय मनात आणून नका. जवळपास सव्वा दोनशे ते २५० जागा लढवणार आहोत”, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
“तुम्ही मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुमची वर्णी लागेल असं समजू नका. सर्व गोष्टी चेक करणार. त्यामुळे टीम येईल, तुम्हाला फोन करेल. बोलतील. त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल. त्यानंतर पावसापाण्याचा विचार करून १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.