दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक तोफा धडाडत असतात. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडत असते. तर गेल्या वर्षीपासून दसऱ्याच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही तोफ दसऱ्याच्या दिवशीच धडाडते. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचीही तोफ दसऱ्याच्या दिवशी धडाडत असते तर मनोज जरांगे पाटील ही उद्याच दसऱ्याच्या दिवशी तोफ डागणार आहेत.
मात्र, यंदा पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे हे कोणत्याही मैदानात जाहीरसभा घेणार नाहीत. ते पॉडकास्टवरून संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे पहिल्यांदाच पॉडकास्टवरून बोलणार आहेत.
त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचीही तोफ धडाडणार असल्याने राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाबाबतची माहिती दिली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजसाहेब पॉडकास्टच्या माध्यमातून बोलणार आहेत. आम्हालाही तेवढीच उत्सुकता आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची वेळ आलेली आहे आणि ती मनसे टिकवणार. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या उद्देशाने आम्ही वाटचाल करत आहोत, असं संदीप देशपांडे म्हणाले.
शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्या आधी राज ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. पॅाडकास्ट आणि सोशळ मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी हा संवाद साधला जाणार आहे. जाहिरात आणि पॅाडकास्टच्या माध्यमातून ‘अभी नही तो कभी नही‘ या थीमवर मनसे कामाला लागली आहे. विधानसभेला राज आणि त्यांचा पक्ष ताकदीनं मैदानात उतरणार आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.