सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय.. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. ८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतो कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे.
महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?', असा सावल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसंच, 'आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.' असे म्हणत राज ठाकरे यांनी मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले ही कविता पोस्ट केली आहे.
त्यांनी पुढे असे लिहिले की, 'पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.', असे म्हणत राज ठाकरे यांनी राग व्यक्त केला.