आजची श्रीराम नवमी माझ्यासाठी विशेष आनंददायी ; राम नवमीदिवशी राज ठाकरेंची खास पोस्ट
आजची श्रीराम नवमी माझ्यासाठी विशेष आनंददायी ; राम नवमीदिवशी राज ठाकरेंची खास पोस्ट
img
Dipali Ghadwaje
आज देशभरामध्ये श्रीराम नवमी ही उत्साहात साजरी होत आहे. अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान, रामनवमीनिमित्त राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहे. तसेच या शुभेच्छा देताना त्यांनी श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या राजकीय पक्षांना टोलाही लगावला आहे.

रामनवमीनिमित्त सोशल मीडियावरून शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले की, श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.

भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो. पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे राज ठाकरे यांनी त्यांच्या रामनवमीनिमित्तच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group