मुंबई : महायुतीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. अद्याप महायुतीत काही जागांचा तिढा असून तो सुटल्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट होईल. दरम्यान, महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समजतेय. महायुतीच्या नेत्यांसोबत मुंबईत एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. शनिवारी रात्री झालेल्या या चर्चेत काही मतदारसंघाबाबत खलबतं झाली. दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. आता महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं याआधीच जाहीर केलंय. दरम्यान, शिंदे फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री गुप्त बैठक घेतली. या बैठकीत महायुतीत पुन्हा बिनशर्त पाठिंब्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समजते. या बैठकीत काही जागांवर महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती समजते.