राज्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलीय तर काही ठिकाणी विश्रांती घेतल्याचे दिसतेय. मात्र, येत्या 48 तासात राज्यात पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई, ठाण्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. उद्या मुंबईत कमाल 30°C तर किमान तापमान 27°C असेल.
तसेच , पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. गेले 3 आठवडे तुफान पाऊस या शहरांमध्ये झाला. पुणे आणि सातारा या शहरात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, येत्या काही तासात जोरदार पाऊस या ठिकाणी होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुण्यात उद्या कमाल 32°C तर किमान 20°C तापमान असेल.
विदर्भात पावसाचा जोर वाढला असल्याचे चित्र दिसते आहे. हवामान विभागाने तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला विदर्भात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, आता नागपूर, अकोला, वर्धा या काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. नागपूरमध्ये उद्या कमाल 32°C तर किमान तापमान 25°C असेल.