विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. दरम्यान , मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे देखील त्यांनी यावेळी कान टोचले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा मी आज त्या नावाला पाठिंबा देतो. एखादी जागा कमी जास्त होऊ शकते मात्र आपली व्रजमूठ कायम ठेवा. जागेवरून मारामाऱ्या करू नका. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं धोरण नको त्यामुळे पाडापाडी होऊ शकते. लढाई आपल्या मित्र पक्षांमध्ये नको असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आज निवडणूक जाहीर करा आमची तयारी आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची ही लढाई आहे. आम्ही आरपारची लढाई लढणार, सरकारनं ज्या योजना आणल्या आहेत, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यांनी योजना दूत आणले, पन्नास हजार योजना दूत त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये महिना, आणि लाडक्या बहिणांना दीड हजार रुपये महिना असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.