…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
img
दैनिक भ्रमर
राज्य सरकारच्या  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे.  दरम्यान या योजनेचा हफ्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे . याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवरच आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमधून दिल्या जाणाऱ्या निधीबाबत मोठं विधान केलं. “सर्वांनी आशीर्वाद आणि बळ दिलं तर १५०० रुपयांचे ३००० होतील”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

“ज्यांनी-ज्यांनी कोवीडच्या काळातही सोडलं नाही. पुण्यात देखील काही कोवीड सेंटर्स उभे केले आणि खोटे रुग्ण दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले. एवढंच नाही तर रुग्णांच्या तोंडची खिचडीही पळवली. त्यांना तुमच्या तोंडचा घास पळवायचा होता. आताही तुमच्या तोंडचा घास हिरवण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. पण मी तुम्हाला सांगतो की, आनंदाचा शिधा आपण दिवाळी दसरा आणि गणपतीमध्ये देतो. त्यामध्ये रवा, मैदा, साखर, तेल, डाळ असं सर्व असतं. त्याही विरोधात ते न्यायालयात गेले होते. विरोधक हे पाप कुठे फेडणार आहेत? मात्र, आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केला.

तसेच , “अजित पवार यांनी देखील आपल्याला सांगितलं, आता मी देखील सांगतो की, आम्ही तुम्हाला १५०० रुपये महिन्याला देत आहोत, म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये. ही लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. उद्या आपल्या सरकारची ताकद आणखी वाढली आणि तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला तर या दीड हजारांचे पावणे दोन हजार होतील, पावणे दोन हजारांचे दोन हजार होतील, तुम्ही बळ दिलं तर दोन हजारांचे अडीच हजार होतील आणि अडीच हजारांचे तीन हजार होतील”, असं मोठं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group