कोणाची आर्थिक फसवणूक कराल तर  खबरदार ! ''या'' शहरातील पोलिसांनी घेतला  मोठा निर्णय
कोणाची आर्थिक फसवणूक कराल तर खबरदार ! ''या'' शहरातील पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
 राज्यातील आर्थिक फसवणुकीच्या गुन्हेगारीत चिंताजनक वाढ झाली आहे. दरम्यान,  आता या  संदर्भात पुणे पोलिसांनी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील आर्थिक फसवणुकीच्या वाढते प्रमाण बघता पुणे पोलिसांनी एक निर्णय घेतला आहे. 

गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करण्यासाठी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण (एमपीआयडी) विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. या निर्णयामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक झाल्यास महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात. गृह विभागाने 25 फेब्रुवारी 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ठेवीदारांना न्याय मिळावा आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये विशेष एमपीआयडी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

हा कक्ष आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. कक्षात उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असणार असून, ठेवीदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा विभाग कार्यरत राहील. फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी गमावलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

तपासादरम्यान, ठेवीदारांनी गुंतविलेल्या रकमेची माहिती संकलित केली जाईल. तसेच, आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती गोळा करून, जर गरज भासली तर त्या मालमत्तेवर टाच आणण्याचा प्रस्ताव न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group