राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अतिशय शुल्लक कारणांवरूनही हत्ये सारखे गंभीर गुन्हे केले जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. मित्रांमध्ये अनेकदा छोटे मोठे वाद हे होतच असतात. पण ह्याच शुल्लक वादाचे रूपांतर भयानक हत्येच्या घटनेमध्ये झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारू प्यायला बसले असताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर युवकाची हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी क्वार्टर परिसरात ही घटना घडली आहे. कार्तिक चौबे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून तो गुंड प्रवृत्तीचा होता. कार्तिक आणि आरोपी रोशन गायकवाड हे सोबत दारू प्यायला बसले होते, पण क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रुपांतर झगड्यात झालं आणि रोशनने कार्तिकवर वार केले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला
आरोपी आणि कार्तिक हे एकमेकांना ओळखणारे होते. सोबत दारू पित असताना त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन जण होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्यासोबत प्यायला बसलेल्यांचा यात काही सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
कार्तिक चौबे हा हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये होता, पण काहीच दिवसांपूर्वी तो जेलमधून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतरही कार्तिकचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सोमवारी रात्री कार्तिक आणि रोशन दारू प्यायला बसले तेव्हा त्यांच्यात वाद झाले, यानंतर कार्तिकने रोशनच्या डोक्यात बिअरची बॉटल मारली, त्यानंतर रोशनने त्याच्याकडचा चाकू बाहेर काढला आणि कार्तिकच्या छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.
कार्तिकची आई आरती उमेश चौबे (वय 55) या रुग्णांना मदतनीस उपलब्ध करून देतात, तसंच त्या नर्सरी शाळेमध्ये शिक्षिका आहेत. आरती चौबे यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. रुग्ण सेवा देऊन आरती चौबे घरी आल्या तेव्हा रात्री 12.50 मिनिटांनी त्यांना शेजारच्यांनी कार्तिकवर हल्ला झाल्याचं सांगितलं. यानंतर आरती चौबे लगेच रुग्णालयात पोहोचल्या, पण तिकडे जाऊन त्यांना मुलाचा मृत्यू जाल्याचं समजलं.