पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलं आहे. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. दरम्यान , पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला आहे. त्यात चार महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहे. अहवालानुसार रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, त्याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. तसेच परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितल्याचे म्हटले होते.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीने चार मुद्यांवर भर दिला आहे. समितीने म्हटले की, महिला रुग्णासाठी सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसृती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती. अगावू रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. रुग्णास दहा ते वीस लाख खर्च येईल, बाळांना दोन-अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरुन दाखल व्हा, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.