पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका चहाच्या दुकानाला आग लागल्याने कामावर पहिल्याच्या दिवशी कामगाराचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास चायच्या दुकानाला अचानक आग लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत तरुणाचा हा कामाचा पहिलाच दिवस होता. प्राथमिक अंदाजानुसार, एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. चहाच्या दुकानात दूध गरम करत असताना अचानक आग लागली, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. आगीमुळे दुकानात मोठी धावपळ उडाली.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारीच कामावर रुजू झालेला हा कामगार दुकानात अडकला आणि आगीत गंभीररित्या भाजला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने आगीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान , अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आजच कामावर रुजू झालेल्या कामगाराचा पहिल्याच दिवशी अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.