महायुती आणि महविकास आघाडी व त्यातले घटक पक्ष आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर असे समीकरणच जणू महाराष्ट्रातील राजकारणाचे झाले आहे . अनेक आमदार मोठे नेते वेळोवेळी पक्षांतर करताना दिसता आहेत. तसेच आरोप प्रत्यारोप हे सुरु असतात. दरम्यान , एका आमदाराने धक्कादायक कबुली दिल्याचं समोर आले आहे .
अजित पवारांसोबत आपण नाईलाजाने गेलो असल्याची धक्कादायक कबुली आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे आणि शरद पवार हे आज वर्ध्यात एकाच व्यासपीठावर आले होते. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीमध्ये आपण होतो, त्यामुळे मी आलो. शरद पवार साहेब आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो, काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली पण राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण राजेंद्र शिंगणे यांनी दिलं आहे.
‘मी जर अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागच्या दोन-अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही. आजही मी त्यांना नेता मानतो. मागच्या 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पवारांचं नाव राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे’, असं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत.
‘मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो. राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने 300 कोटी दिले आहेत, पण निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील’, असं विधान राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे.‘भविष्यातही पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे. मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. जवळपास 30 वर्ष झाली त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे’, अशी प्रतिक्रिया राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.