मनमाड:- सध्या देशात गाजत असलेल्या बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालून माहिती घेत आहेत. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि त्यांना शिक्षा होईलच, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मनमाड येथे व्यक्त केले.
मालेगाव येथील वोट जिहाद भाग दोन प्रकरणात अधिकऱ्यासोबत बैठक घेण्यासाठी ते मालेगावला जाण्यासाठी मनमाड मार्गे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महादेव ऍपद्वारे देखील मोठा घोटाळा झाला असून याचादेखील मी तपास सुरू केला आहे. लवकरच याबाबत देखील माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालेगाव येथील नामको बॅंकेतून वोट जिहादसाठी करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला. या प्रकरणी आज मालेगाव येथे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आयुक्त यांच्यासोबत माझी बैठक आहे यासाठी मी मालेगावला आलो आहे.
तसेच बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून यात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना मग तो कोणीही असो सर्वांना शिक्षा होणार आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील महादेव ऍप द्वारे देखील मोठा घोटाळा करण्यात आला असुन यात अनेक सर्वसामान्य देखील होरपळले आहेत. यातील मी माहिती घेत असुन या प्रकरणी देखील लवकरच मी मीडियाला माहिती देईल, असे सोमय्या म्हणाले.