उघड्या डीपीमुळे विजेचा धक्का पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत ; नाशिकरोड मधील दुर्घटनेने हळहळ
उघड्या डीपीमुळे विजेचा धक्का पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत ; नाशिकरोड मधील दुर्घटनेने हळहळ
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- परिसरातील जाऊद्दीन डेपो परिसरात खेळताना उघड्या डीपीला हात लागल्याने वीजेच्या तीव्र धक्क्यामुळे आफ्फान नईम खान या पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. आज दुपारी चार वाजता घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत असून शहरातील उघड्या डीपी जीवघेण्या ठरल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. 

याबाबतचे अधिक वृत्त असे की, आफ्फान नईम खान वय (०५)रा. आनंद कॉम्प्लेक्स मागे, गुलजारवाडी, सुभाष रोड, नाशिकरोड याची आई जाऊद्दीन डेपो येथील वजन काट्याच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये बारदान गोणी शिवण्याचे काम करते. नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या असताना आफ्फानही बरोबर होता. आई कामात गुंतलेली असतानाच आफ्फान हा खेळायला गेला. खेळता खेळता त्याचा हात उघड्या डीपीला लागला.

डीपीतील वायरींमुळे त्याला वीजेचा तीव्र धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला बाजूला करून नजिकच्या बिटको रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. 

या दुर्घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली तर त्याच्या मातेला दुःख अनावर झाले होते. आफ्फानचे वडील नईम खान हे पेंटींग काम करतात. शहरातील काही भागात उघड्या डीपी असून त्या धोकादायक स्थितीत आहे.

अशाच एका डीपीमुळे पाच वर्षीय बालकास हकनाक प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे वीज मंडळाने उघड्या डीपींबाबत तातडीने उपाय योजना करावी, व त्याच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group