नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे सोमवारी मालेगाव दौर्यावर येणार आहेत. यावेळी ते व्होट जिहाद प्रकरणात नवीन काय माहिती सांगतात, तसेच नामकोशी संबंधित घोटाळ्याविषयी कोणती नवीन माहिती बाहेर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये येऊन व्होट जिहाद प्रकरणाचा भंडाफोड केला होता. त्यानंतर राज्यासह संपूर्ण देशभरात या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली होती.
नाशिकमधील नासिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर काही बँकांचा यामध्ये सहभाग आहे, हे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा सीबीआय, रिझर्व्ह बँक व इतर अन्य केंद्रीय संस्थांनी तपास सुरू केला. त्यानंतर अनेक बाबी समोर आल्या होत्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे डिसेंबरमध्ये नाशिक दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मालेगावच्या प्रकरणांमध्ये अधिक तपास सुरू केला होता. यात अडकलेले तरुण यांना भेटले होते आणि त्यांच्याशी चर्चा केली होती, तसेच काही दिवसांपूर्वीच ट्विटरद्वारे या प्रकरणांमध्ये मुंबईतीलही काही बँका सहभागी असल्याचे समोर आणले आहे.
आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे मालेगावमध्ये येणार आहेत. त्यांच्या दौर्याच्या वेळापत्रकानुसार सोमवारी रेल्वेने मनमाडमध्ये उतरतील व त्यानंतर मोटारीने मालेगाव येथे जातील. या ठिकाणी बारा वाजता ते मालेगावच्या तहसीलदारांना भेटतील. त्यानंतर महापालिका आयुक्तांना भेटतील आणि दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्यापूर्वी ते नासिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये जाऊन अधिकार्यांशी चर्चा करतील.
आता ते नवीन काय सांगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.