राज्यात चर्चेत असलेल्या लाडक्या बहीण योजनेवर होणाऱ्या प्रत्यारोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे . लाडकी बहीण योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. योजनांबद्दल महिलांना माहिती नसते, त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही जन सन्मान यात्रा घेऊन फिरत असून आतापर्यंत 22 मतदारसंघात आम्ही गेलो, पुढेही आम्ही जाणार अशी माहिती अजित पवारांनी दिली. दरम्यान यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. दिलेली ओवाळणी कोणी परत घेतं का? अशी विचारणा करत त्यांनी हा दावा फेटाळला.
"जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी अनेक महिलांना झिरो बॅलेन्सवर खातं सुरु करुन दिलं आहे. त्यांना पैसे मिळाले असून त्यांनी ते काढूनही घेतले आहेत. मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांसंबंधी तक्रार आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील भाषणात आम्ही जी ओवाळणी दिली आहेत त्यात कोणतीही काटछाट होणार नाही असं सांगितलं आहे. राष्ट्रीयकृत बँकांना यासंदर्भात सूचना दिल्या जाणार आहेत. जुनं कर्ज असेल तर याचा त्याच्याशी काही संबंध नसेल," अशी माहिती अजित पवारांनी दिली.
तसेच , सुरुवातीला आमच्या योजनांवर टीका करण्यात आली. हे होणारच नाही असे दावे कऱण्यात आले. फक्त 1500 रुपये दिले अशीही टीका करण्यात आली. पण आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एका हातात राख्या पुरत नाहीत आहेत. काहीजण कोर्टात गेले पण कोर्टात टिकले नाही. पैसे पाठवल्यानंतर लगेच काढा नाहीतर काढून घेतील असंही म्हणाले. आता दिलेली ओवाळणी कोणी परत घेतं का? आम्हाला शंका येते की हे कशाकरीता चालू आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. पण योजनेच्या विरोधात नरेटिव्ह सेट होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करू," असं ते म्हणाले.
"पुढील महिन्यात प्रत्येक घरावर हेल्पलाईनचे स्टीकर लावले जातील. या हेल्पलाईनद्वारे भ्रष्टाचार विरोधी तक्रारसुद्धा करता येणार आहे. या हेल्पलाईनचा एक डेक्स उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असेल. आतापर्यंत 10 हजार समस्यांचे निरसन करण्यात आले आहे. मी काम करत असताना जात धर्म बघत नाही. लाभार्थी हा एकच जात आणि धर्म आहे. या योजनांमध्ये आम्ही सगळ्यांना सामावून घेतले आहे. कुठल्याही घटकाला आम्ही सोडले नाही," असंही त्यांनी सांगितलं.