विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांत मोठमोठ्या घडामोडींना वेग आला असून ,ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या खेळी सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातील मोठे राजकीय प्रस्थ आणि विखे पाटलांचे कट्टर समर्थक रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
राहुरीचे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून या कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांच्या प्रचारात आग्रेसर असणारे आणि कट्टर विखे पाटील समर्थक, अशी ओळख असलेले रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांच्यासह अनेक विखे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सोहळा संगमनेर येथे पार पडला.
विखे पाटलांचे निकटवर्तीय माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून आम्हाला त्रास होता, आम्हाला चांगली वागणूक दिली जात नव्हती त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया यावेळी चाचा तनपुरे यांनी दिलीये. यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात जो आदेश देतील त्या पद्धतीने काम करू, असे तनपुरे म्हणाले आहेत.
सगळीकडेच काँग्रेस आणि आघाडीचे वातावरण आहे. काही लोकांनी आश्वासनं देऊन शब्द पुरा केला नाही. त्यामुळे चाचा तनपुरे यांचा भ्रमनिरास झाला. आगामी काळात ते आघाडीचे काम करतील, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांचे नाव न घेता दिली आहे.