राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन दिवसांपूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 जणांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर कालपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेते हे नाराज झाले आहेत. या नाराज व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचाही समावेश आहे. आता तानाजी सावंत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. तानाजी सावंत यांनी आजाराचे कारण देत तडकाफडकी पुण्याला निघून गेले. त्यातच आता तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा दिला आहे.
धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं
तानाजी सावंत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वी त्यांचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. तसेच त्यांनी कव्हर इमेजही बदलली आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण हटवत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. त्यावर शिवसैनिक असे नमूद केले आहे.
तानाजी सावंत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यातच त्यांनी हा बदल केल्याने ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तानाजी सावंत हे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होणार नाहीत. तानाजी सावंत यांच्या नाराजी नाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.