विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा झाला तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता कधी स्थापन करणार, याबाबत स्पष्टता दिसत नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. तसेच ईव्हीएमविरोधातील लढाई तीव्र केली आहे. या घडामोडींवर मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत. आपल्या दरे गावी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी परतले. यानंतर शिवसेना शिंदे गटातील आमदारांसोबत तसेच महायुतीतील नेत्यांसह बैठका होता. परंतु, या सगळ्या बैठका एकनाथ शिंदे यांनी रद्द केल्या आहेत. प्रकृतीत अद्यापही सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
या निवडणुकीत पराभूत झालेले मनसे नेते राजू पाटील यांनी ईव्हीएमवरून टीकास्त्र सोडले तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
काय म्हणाले राजू पाटील?
राजू पाटील म्हणाले की, या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले. शेवटी यांना भाजपा जे सांगेल तेच करावे लागणार आहे. पण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीही अशा गोष्टी सरू आहेत का, अशी शंका येते, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जो निकाल लागला तो स्वीकारला आहे. निकालानंतर ईव्हीएमबाबत जी ओरड सुरू आहे, तो मुद्दा आमच्या पक्षाने आणि राज ठाकरे यांनी २०१८ मध्येच उपस्थित केला होता. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. आता माझ्याच मतदारसंघाबाबत बोलायचे झाल्यास, इथे ६५ हजार मतदार वाढले आहेत आणि प्रतिस्पर्धी उमेदवार ६६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. म्हणजे वाढलेल्या ६५ हजारांपेक्षा १ हजार जास्त मते विरोधी उमेदवाराला कशी मिळाली, असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.