राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणे एकाला महागात पडलं. शरद पवारांना देशी कट्ट्याने उडवून अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहार मधून अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार , पोलिसांनी त्याला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दीड वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नारायणकुमार सोनी असे शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर नारायणकुमार याने कॉल करुन धमकी दिली होती.
2 डिसेंबर 2022 रोजी नारायणकुमार सोनी यांने पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी लँडलाईनवर २५ ते ३० कॉल्स करून आरोपीने त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. १४ डिसेंबर २०२२ रोजी नारायणकुमार सोनी याला अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर नारायणकुमार याला दोषी ठरवलं, त्याला आज न्यायालयाने दीड वर्षांची शिक्षा सुनावली.
नारायणकुमार याने पवारांना धमकी दिल्याचं कॉल डेटा रेकॉर्डमधून स्पष्ट झालं आहे. नारायणकुमार सोनी याची शिक्षा माफ करता येणार नाही असं म्हणत नारायणकुमारला एका गुन्ह्यात तीन महिन्यांची आणि धमकी दिल्या प्रकरणी दीड वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
2 डिसेंबर 2022 रोजी सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत नारायणकुमारने सिल्वर ओक बंगल्यावर 25 ते 30 कॉल केले होते. या प्रकरणी शरद पवार यांच्या निवासस्थानावरील टेलीफोन ऑपरेटर कृष्णा देऊळकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.