विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला असून दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मुळे मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला फटका बसल्याचा आरोप महाविकास आघाडीतून केला जात आहे.
दरम्यान, ईव्हीएम च्या विरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाले असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात पहिले आंदोलन करण्यात आले आहे.
पाथर्डीमध्ये ॲड. प्रतापकाका ढाकणे यांनी आयोजित केलेल्या आभार मेळाव्याला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि येणाऱ्या निवडणुकीत जनमताचं प्रतिबिंब निकालात उतरवायचं असेल तर अधिक जागरुक राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. शेवगाव-पाथर्डीच नाही तर एकूणच राज्यातील विधानसभेच्या निकालाबाबत मतदारांमध्ये अनेक शंका आहेत. त्यामुळं महायुतीला मिळालेला हा विजय जनतेचा कौल नाही तर ईव्हीएमच्या माध्यमातून चोरलेला निकाल असल्याची लोकभावना आहे. त्यामुळेच पाथर्डी तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची होळी केली, असे रोहित पवार यांनी सांगितले.
दरम्यान , प्रतापकाका ढाकणे यांच्या आभार मेळाव्याला शिवशंकर राजळे, हरिश भारदे, राणीताई लंके, नासिरभाई शेख, बंडू पाटील बोरुडे, योगिताताई राजळे, सिताराम बोरुडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.