माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. शरद पवार यांनी पहिल्यांदाच ही शंका उपस्थित केली आहे.
ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते. आम्हाला काही लोकांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं होतं. पण आम्ही विश्वास ठेवला नाही. मात्र, आता ईव्हीएम हॅक होऊ शकते हे लक्षात आलं आहे, असं सांगतानाच निवडणूक आयोग तरी चुकीचं वागणार नाही असं वाटत होतं, असा हल्लाही शरद पवार यांनी चढवला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. त्यांना भेटण्यासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी भाजपसह निवडणूक आयोगाचीही खरडपट्टी काढली. ईव्हीएम मशीन हॅक होते का याचा माझ्या हातात पुरावा नाही. निवडणुकीपूर्वी काही लोकांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. या पद्धतीने मशीन हॅक करणं शक्य असल्याचं म्हटलं होतं. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ही आमची कमतरता होती.
निवडणूक आयोग इतकी टोकाची चुकीची भूमिका घेईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. या संस्थेवर आम्ही गैरविश्वास ठेवला नाही. पण निवडणुकीत यात तथ्य आहे, असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.
फेरमतमोजणीत काय येतं ते पाहू. यातून काही फार पुढे येईल अशी शंका वाटते. मतदानाच्या शेवटच्या 2 तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे. बाळासाहेब थोरातांसह अनेकांनी अशी माहिती समोर आणली आहे. पुराव्यासह दिली आहे. त्याचा विचार करावा लागेल. काँग्रेस कार्यकारिणीची काल बैठक झाली. त्यात हा विषय झाला. इंडिया आघाडीने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवार किंवा मंगळवारी ही चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
15 टक्के मते सेट केली यावर आमचा आधी विश्वास बसत नव्हता. आता त्यात तथ्य आहे असं दिसायला लागलंय, असंही त्यांनी सांगितलं.
या देशात निवडणुका झाल्या. त्यासंबधिची अस्वस्थता देशातील सर्व भागात आहे. त्याबद्दलचं जनमत ते जनमत बाबांच्या आंदोलनातून व्यक्त होतंय. कालच्या निवडणुका झाल्या त्या सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर झाला. या गोष्टी पूर्वी झाल्या नव्हत्या. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत अशा तक्रारी ऐकायला मिळतात. पण देशातील या निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा वापर करून सर्व यंत्रणा हाती घ्यायची हे चित्र दिसलं नव्हतं. ते यावेळी महाराष्ट्रात दिसलं. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे, असं शरद पवार म्हणाले.