राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. तर काही नेते अगदी थोडक्या मतांनी जिंकले आहेत. अशातच कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात शेवटपर्यंत चुरशीची लढत झाली. मात्र यात रोहित पवारांचा अगदी कमी मतांनी विजय झाला. यातच पठ्ठा वाचला तु.. माझी सभा झाली असती काय झालं असतं ? असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. तोच धागा पकडत आता राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी अजित पवार आणि रोहित पवार कराड येथे आमनेसामने आलेत. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील संवादाचा धागा पकडत राम शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे.
कर्जत-जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता. यात माझा बळी घेतला गेला. आमदार रोहित पवार स्वत:ला भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री समजत होते. त्यांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला नाही.. एकूणच राजकीय सारीपाठीमध्ये जे घडले त्यांचा मी बळी ठरलो असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जत-जामखेड बाबत पक्षश्रेष्ठींना अगोदर कल्पना दिली होती. निवडणुकीवेळी थेट तक्रारी देखील केल्या होत्या. माध्यमांमसोर या विषयावर बोलायचे नव्हते. पण सुरूवात अजित पवार यांनी केली म्हणून बोलावे लागले. राज्यात खुप कमी फरकाने पराभव झालेल्यांमध्ये माझ्या नावाचा समावेश आहे. माझ्याविरोधात अघोषित कारवाईच्या कटाचा बळी ठरलो आहे ,असेही त्यांनी सांगितले.