महायुतीला राज्यातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला असून राज्यातील सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता सरकार कधी स्थापन होणार, कोण मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. पण सरकार स्थापन करण्यासाठी भाजप महायुतीला अजून काही अवधी लागणार असून पुढील २-३ दिवसांमध्ये सरकार स्थापन होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे पूर्ण बहुमत आहे. सकाळपासून शिवसेना शिंदे गटाची बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपचंही विचारमंथन सुरू आहे. अशात सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. भाजपकडे सर्वाधिक १३२ जागा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर भाजपचा एकहाती दावा करणार आहे. तसंच मंत्रिमंडळात कोण कोण असणार यावरही बैठकसत्र सुरूच राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागणार आहे. अशात मुख्यमंत्रिपदाची शपथ कधी होईल याबद्दलही सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान, 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे किंवा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणे बंधनकारक नाही. विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल, ही धारणा चुकीची आहे, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची एका वृत्तवाहिनीला दिली आहे. 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे, असं कोणतेही संवैधानिक बंधन नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय आधी लागणार आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती समोर आली आहे.
यापूर्वी अनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे झालेले शपथविधी
- दहावी विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली. 11 व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर 2004 रोजी झाला.
- अकराव्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली. बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 7 नोव्हेंबर 2009 रोजी झाला.
- बाराव्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर 2014 रोजी संपली. तेराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 31 ऑक्टोबर 2014 रोजी झाला.
- तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपली. चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर 2014 रोजी झाला.