मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार आहे.
भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मांडण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
अशातच आता आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली असून त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे
काय लिहिलंय निमंत्रण पत्रिकेत?
महाराष्ट्र शासनाकडून मान्यवरांना पाठवण्यात आलेल्या या निमंत्रण पत्रिकेत असा मजकूर आहे की, श्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान, फोर्ट,मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपया उपस्थित राहावे ही विनंती, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून ही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.