दादरच्या 80 वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने दादरच्या हनुमान मंदिराच्या विश्वस्थांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटलंय की, दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे. 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असं नोटीसमध्ये म्हटल्याची माहिती आहे.
दरम्यान मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला… असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांचा चांगलाच टोला लगावला आहे. तर चित्रा वाघ पुढे असेही म्हणाल्या की, संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपविला अजून किती माती करून घेणार उद्धवजी..? असा हल्लाबोल करत चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना देखील खोचक सवाल केलाय.
८० वर्षापासून दादर रेल्वे स्थानकाबाहेर हमालांनी हनुमानाचं मंदिर बांधलं. त्याला रेल्वेने नोटीस पाठवली. तुमचं कोणतं हिंदुत्व. तुम्ही आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणता. मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे?, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सामनाची बातमी दाखवली यावेळी चुकून त्यांच्याकडून हनुमानाच्या मंदिराऐवजी गणपतीचं मंदिर असा उल्लेख करण्यात आला. यावरून चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत त्यांना घेरलं असल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरेंनी या घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरही निशाणा साधला आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घणाघात केला. ‘तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे. इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे. हिंदू म्हणजे नुसती मतं नाही. त्यांना भावना आहे. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्यांचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी होतं का? हिंदुंची मते हवी. त्यांना भयभीत करायचं. घाबरवायचं आणि सत्तेत आल्यावर स्वत मंदिरं पाडायचं. मंदिरं कुठे सेफ आहेत. बांगलादेशात नाही आणि मुंबईतही नाही. एक है तो सेफ है म्हणता मग मंदिर कुठे सेफ आहे? आपल्या मुंबईतील मंदिर पाडण्याचा फतवा रेल्वे काढत आहे. तेव्हा फडणवीस आणि भाजपचं हिंदुत्व काय करत आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.