नाशिक जिल्ह्यात बंडखोरांचे बंड शहरात थंड, ग्रामीण भागात मात्र कायम
नाशिक जिल्ह्यात बंडखोरांचे बंड शहरात थंड, ग्रामीण भागात मात्र कायम
img
दैनिक भ्रमर

नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी माघारीनंतर आता जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक चुरशीची होणार आहे. यापैकी ग्रामीण भागातील काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांचेच मोठे आव्हान असून, त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज उमेदवारीची माघारी प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. या प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची भाऊ गर्दी ही मोठी झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बंडखोरांचे बंड कायम राहिल्यामुळे निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शहरातील बंडखोरांचे बंड हे महाविकास आघाडी व महायुतीकडून शांत झाले आहे.

नाशिकमधील मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गिते यांना आव्हान दिलेले आहे. या ठिकाणी मात्र महाआघाडीमध्ये बिघाडी झालेली होती. काँग्रेसचे बंडखोर आणि प्रवक्त्या हेमलता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे या दोघांनी माघार घेतली आहे.नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे उभे आहेत. माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यांच्याबरोबरच या मतदारसंघातून मनसेचे दिनकर पाटील हेदेखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन मनसेकडून उमेदवारी करीत असून, याच मतदारसंघातून माजी महापौर दशरथ पाटील हेही निवडणूक रिंगणात असल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्येदेखील भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून गणेश गिते हे निवडणुकीत उतरल्याने ही लढतही चुरशीची होणार आहे.देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनाही चांगलेच आव्हान निर्माण झालेले आहे. या ठिकाणी मनसेच्या मोहिनी जाधव यांच्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप आणि भाजपामध्ये सहभागी झालेल्या माजी तहसीलदार आणि नंतर निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या उमेदवार असलेल्या राजश्री अहिरराव यांचेदेखील आव्हान आहे. राजश्री अहिरराव यांनी माघारी घ्यावी, यासाठी शिंदे गट प्रयत्नशील होता; मात्र अखेरपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

निफाड मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना ठाकरे गटाचे मोठे आव्हान आहे. या ठिकाणी माजी आमदार अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचादेखील उमेदवार उभा आहे आणि त्यामुळे मत विभागणी होणार आहे.चांदवड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांच्यासमोर भाजपामधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार त्यांचे भाऊ केदा आहेर यांचा मोठा सामना करावा लागणार आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल हे उमेदवार आहेत.

कळवण विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांच्यासमोर माकपचे जे. पी. गावित आणि बंडखोरी केलेले रमेश थोरात यांचा सामना करावा लागणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उदय सांगळे यांचे मोठे आवाहन असून, त्या ठिकाणी देखील या दोघांमधील लढत ही महत्त्वपूर्ण आहे.

बागलाण विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनाराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार दीपिका चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाचे जयश्री गरड, संजय ठाकरे आणि अपक्ष राकेश घोडे यांचा सामना करावा लागणार आहे
दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुनीता चारोस्कर यांचा सामना होणार आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे बंडखोर उमेदवार व माजी आमदार धनराज महाले यांनी आपला सूचक पाठवून उमेदवारी मागे घेतली.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये एमआयएमचे विद्यमान आमदार मोहम्मद मुक्ती यांना इंडियन पार्टीचे असिफ शेख काँग्रेस पक्षाचे एजाज बेग आणि समाजवादी पार्टीचे शान निहाल अहमद यांचा सामना करावा लागणार आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्याशी होणार आहे. या ठिकाणी माजी शिवसैनिक आणि बारा बलुतेदार मित्र मंडळाकडून उमेदवारी करत असलेले बंडूकाका बच्छाव हेही निवडणूक रिंगणात आहेत.

नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे, अपक्ष म्हणून समीर भुजबळ व ठाकरे गटाकडून गणेश धात्रक यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येवला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ, तसेच शिवसेना ठाकरे गटाशी बंडखोरी केलेले कुणाल दराडे आणि सचिन आहेर यांच्यात सामना होणार आहे. 

इगतपुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सहभागी झालेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्यासमोर काँग्रेसचे लकी जाधव, मनसेचे काशीनाथ मेंगाळ आणि शिवसेना ठाकरे गटात कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले, तसेच अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांचे आव्हान आहे. गावित यांची बंडखोरी कोणाला डोकेदुखी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group