महायुतीच्या दणदणीत विजयांनंतर महायुतीतील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड करण्यात येईल याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहेतर, दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी जोरदार बॅटिंग केली जात असताना भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीतून क्लिअर मेसेज दिला आहे.
दरम्यान आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आज दिल्लीत होणार आहे. दिल्लीमध्ये आज रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. भाजप नेते एकनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत, तसंच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण मुख्यमंत्री ब्राह्मण केला तर वेगळा मेसेज जाऊ शकतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली, त्यांना लोकांनी स्वीकारलं आहे. एकनाथ शिंदे यांना समजावलं जात आहे, त्यांना काही अधिकची पदं दिली जातील, असं भाजपच्या दिल्लीतल्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
तसेच , महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असं दिल्लीतल्या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचं मत आहे. एवढ्या चांगल्या जागा निवडून आल्या असताना मुख्यमंत्रिपद सोडणं योग्य नाही, असं मत भाजपच्या नेत्याने मांडलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज चर्चा करून दिल्लीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.