काय प्रकार ?  ऑफिस मध्ये डुलकी घेत होता म्हणून कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणे कंपनीला महागात पडले, द्यावी लागणार 40 लाखांची भरपाई
काय प्रकार ? ऑफिस मध्ये डुलकी घेत होता म्हणून कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणे कंपनीला महागात पडले, द्यावी लागणार 40 लाखांची भरपाई
img
दैनिक भ्रमर

आजकाल कानावर अजब अशा घटना येत असतात. त्या ऐकल्या की  आपल्याला पण विश्वास नाही बसत आणि खरच असं पण होऊ शकत का असा प्रश्न आपल्याला पडल्याविना राहत नाही. अशीच एक घटना चीन मध्ये घडली आहे. हे वाचून तुम्हालाही  वाटेल नेमका काय प्रकार आहे? 

चीनमधील एका कंपनीला कार्यालयात कामाच्या वेळेत झोप घेतल्याने कर्मचाऱ्याला काढून टाकणे महागात पडले. नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली. सुनावणीनंतर स्थानिक न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आणि कंपनीला 350,000 युआन भरपाई देण्याचे आदेश दिले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी नागरिक झांग हे तैक्सिंग शहरातील एका केमिकल कंपनीत गेल्या 20 वर्षांपासून काम करत होते. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, झांग रात्री उशीरा शिफ्टमध्ये काम केल्यानंतर सुमारे एक तास झोपले होते.

दरम्यान , झांग झोपल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या या निर्णयाला झांग यांनी न्यायालयात आव्हान दिले. कोर्टात, कंपनीने कबूल केले की, झांगची झोप थकव्यामुळे आली होती, परंतु नोकरीवर झोपण्याच्या ‘शून्य-सहिष्णुतेच्या धोरणामुळे’ त्यांना काढून टाकले. कामगार संघटनेने या निर्णयाला मान्यता दिल्याचेही कंपनीने न्यायालयाला सांगितले.

झांग यांनी कंपनीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आणि न्यायालयाकडून न्यायाची मागणी केली.  सुनावणीनंतर न्यायालयाने कंपनीचा निर्णय चुकीचा मानला. झोपेसारख्या चुकीसाठी नोकरीतून काढून टाकणे हा अत्यंत कठोर निर्णय असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने नमूद केले की, कंपन्यांना कामाच्या ठिकाणी नियम लागू करण्याचा अधिकार आहे, परंतु अशा कृती गुन्ह्याच्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. झांगच्या डुलकीमुळे कंपनीचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 

तसेच, न्यायाधीश म्हणाले की झांगने 20 वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच ही चूक केली आणि यामुळे कंपनीचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही. न्यायालयाने झांग यांचा दोन दशकांचा निर्दोष रेकॉर्ड आणि त्यांना मिळालेल्या पदोन्नती लक्षात घेऊन कंपनीचा निर्णय चुकीचा ठरवला. न्यायालयाने कंपनीला 350,000 युआन (सुमारे 40 लाख रुपये) ची नुकसानभरपाई झांगला देण्याचे आदेश दिले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group