पुण्यानजीकच्या शिक्रापूर येथे अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे . दुचाकीवरून शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे . भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर - चाकण महामार्गावर ही घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिरामध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , शिक्रापूर - चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. शाळेमध्ये जात असताना चिमुकल्यांवर काळाने घाला घातला. दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गणेश खेडकर या तरुणासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला.
गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच मुलांना आपला जीव गमवावा लागला.
गणेश खेडकर या तरुणासह तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी मृतांची नावं आहेत. तन्मय तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम दुसरीमध्ये शिकत होता. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.