कार चालवताना रशियन तरुणी अचानक चालकाच्या मांडीवर बसली, स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन्..., नेमकं काय घडलं?
कार चालवताना रशियन तरुणी अचानक चालकाच्या मांडीवर बसली, स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन्..., नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये बुधवारी रात्री एका रशियन पर्यटक महिलेने अपघातानंतर धिंगाणा घातल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मद्यधुंद रशियन महिला एका इंडिगो कारमधून मित्रांसमवेत जात होती. 

यावेळी चालकाच्या शेजारी बसलेली असताना ती अचानक चालकाच्या मांडीवर येऊन बसली. ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेल्या कारने समोरून येणाऱ्या एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर तीन लोक बसलेले होते. या अपघातात तिघेही जखमी झाले. यानंतर सदर महिलेने पोलिसांबरोबर जाण्यास नकार देत राडा घातला.

रायपूरच्या तेलीबांधा पोलीस ठाण्याच्या परिसरात सदर घटना घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि दुचाकीवरील जखमींची मदत केली. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कारमध्ये बसलेली रशियन महिला आणि तिचा मित्र मद्यधुंद अवस्थेत होते. रशियन महिला कार चालकाच्या मांडीवर बसली होती. यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघातानंतर बराच वेळ याठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती.

रशियन महिला आणि तिचा मित्र ज्या कारमध्ये बसले होते, त्याच्या पुढच्या भागाचे बरेच नुकसान झाले असून त्यावरून अपघात भीषण असल्याचे दिसते. दुचाकीचाही पुढच्या भगाचा चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात हलवले. यानंतर कारमधील युवक आणि रशियन महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेने पोलिसांच्या गाडीत बसण्यास नकार देत गोंधळ घातला.

रशियन महिलेचा गोंधळ बराच वेळ सुरू होता. यादरम्यान काही स्थानिकांनी व्हिडीओ चित्रीकरण केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी महिलेला सहकार्य करण्याची विनंती केली, मात्र आपला फोन परत द्या, अशी मागणी करत महिलेने गोंधळ घातला. पोलिसांबरोबर मध्यरात्री महिला शिपाई उपस्थित नसल्यामुळे ती स्वतःहून गाडीत बसावी, यासाठी बराच वेळ प्रयत्न करण्यात येत होता.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला पर्यटनासाठी रायपूरमध्ये आली होती. तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या वाहनावर भारत सरकार अशी पाटी असल्यामुळे गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी मागितली. दरम्यान दुचाकीवरील तीनही जखमींना तात्पुरत्या उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group