बुलढाण्यामध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. अमडापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बुलढाण्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मृतांमध्ये २ चुलत भाऊ आणि मित्राचा समावेश आहे. मृत तरुण हे चिखलीवरून उदयनगर येथे जात असताना काल रात्री उशिरा ही घटना घडली. अमडापूर येथे राहणारे प्रतिक भुजे (२५ वर्षे), प्रथमेश भूजे (२६ वर्षे) आणि सौरभ शर्मा (२४वर्षे) हे तिघे मित्र पुष्पा २ चित्रपट पाहण्यासाठी दुचाकीवरून चिखलीला गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर मध्य रात्री दीडच्या सुमारास ते परत आपल्या गावी येत होते.
त्याचवेळी अमडापूर गावाजवळ टिपू सुलतान चौकात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे तिघेही फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा आवाज आल्याने बाजूला असलेल्या टायर पंचरच्या दुकानातील मजुराला जाग आली आणि तो अपघातस्थळी धावत गेला. तेव्हा त्याला तिघेही तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले दिसले. अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. या मजुराने तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही तरुणांना तात्काळ रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषीत केले. या अपघातात मृत्यू झालेले दोन तरुण एकाच घरातील असून ते चुलत भाऊ होते आणि तिसरा त्यांचा मित्र होता. तिघेही तरुण उदयनगरचे रहिवासी होते. अमडापूर पोलिसांनकडून अज्ञात वाहनाचा कसून शोध घेतला जात आहे.
अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कलम १०६ (१) २८१, भारतीय न्याय संहिता सहकलम १३४/१७७ एमव्ही अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.